From blogs

११ तासांचा थरार: अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रीहरीची सुखरूप सुटका!

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Jun 26, 2024

श्रीहरीचा पुनर्जन्म झाला...

             सकाळी सहाच्या वंदे भारत एक्सप्रेस ने छत्रपती संभाजीनगर हून मुंबईकडे रवाना झालो. प्रवासात काचेतून बाहेरचा निसर्ग पाहत रममान झालो होतो. बघता बघता मनमाड क्रॉस करून नाशिक रोडच्या पुढे गाडी निघाली. हिरवाईने नटलेल्या निसर्ग न्याहाळत वंदे भारत मधील नाश्त्याचा मनमुराद आनंद घेत होतो. ऑफिसच्या कामाचे फोन तर अधून मधून चालूच असतात. कदाचित गाडी माटुंग्याच्या आसपास आली असेल, तेवढ्यात मित्रवर्य कृष्णा मुजमुले यांचा बारा वाजण्याच्या सुमारास भयभीत होऊन कॉल आला.. "साहेब, श्रीहरीच अपहरण झालंय..!" आणि तो धाय मोकलून रडत कैफियत मांडू लागला. 
          श्रीहरी कृष्णा मुजमुले हा वय वर्ष १३ असलेला मुलगा इयत्ता सातवी वर्गामध्ये नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जालना येथे शिक्षण घेत आहे. दररोज सकाळी शाळेत जाणारा श्रीहरी आज शाळेत पोहोचलाच नाही. तितक्याच वेळेत कृष्णाच्या मोबाईल वर अज्ञात इसमाचा कॉल आला, " तुला श्रीहरी जिवंत पाहिजे असेल तर पाच कोटी रुपयांची रक्कम त्वरित तयार ठेव..!" पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी एकूण साहजिकच कृष्णाच्या पायाखालची जमीन सरकली. आणि त्याने पहिला कॉल मला केला. कृष्णा मुजमुले यांचा आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय आहे. त्याने प्रचंड मेहनत घेऊन केलेली आर्थिक भरभराट काही जणांना सहन न झाल्याने कोणीतरी हे षडयंत्र रचले होते.
 कृष्णा घाबरलेल्या अवस्थेत मला सांगत होता की, संबंधित व्यक्ती अतिशय निष्ठूर आहे. तो मला कॉल करून धमक्या देत आहे की, पोलीस प्रशासनाला जर कळवले तर श्रीहरीचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला थोडसं स्थिर केलं आणि राज्याचे गृहमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना तात्काळ मेसेज केला, साहेबानी तोच मेसेज एस पी जालना याना केला.दरम्यान जालन्याचे पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी वर तात्काळ संपर्क केला. बंसल साहेब हे पालकमंत्री मा.अतुल सावे साहेब यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांचा मला रिप्लाय आला की, मी बैठकीत व्यस्त आहे. मी त्यांना तात्काळ मेसेज करून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. आणि त्यांनीही तितक्याच शीघ्रतेने अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी जी यांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांना अवगत देखील केले. आयुषजी बोलत असताना त्यांनी माझ्याकडून कृष्णाचा संपर्क क्रमांक घेऊन त्यांना स्वतःहून कॉल केला व धीर दिला. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी आपली सर्व टीम या कामाच्या मागे लावली. मी श्री आयुषजी यांना विनंती केली की, जर चुकून अपहरणकर्त्यांना ही माहिती कळाली की कृष्णा हा पोलिसांच्या संपर्कात आहे तर श्रीहरीच्या जीव धोक्यात जाईल. परंतु त्यांनी सिविल ड्रेस मधील पोलीस घरी पाठवून योग्य ती माहिती घेतली.  खंडणी मागण्यासाठी ज्या मोबाईल वरून कॉल आला होता तो क्रमांक प्राप्त करत आपल्या शोध मोहिमेला सुरुवात केली. 
          खंडणीबहाद्दरांनी मुलाच्या जीवाचा सौदा म्हणून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कृष्णा अक्षरशः हतबल झाला होता. परंतु पोलीस प्रशासन व मी स्वतः त्याच्या संपर्कात राहून त्याला सतत धीर देत होतोत की, आपल्याला आता लढावेच लागेल. कृष्णाने दिवसभर खंडणी करता येणाऱ्या प्रत्येक फोन स्वीकारत त्यांना बोलण्यामध्ये गुंग ठेवले होते. तीन-चार कॉल झाल्यानंतर अपहरणकर्त्यांची भाषा बदलली. शेवटी तीन कोट रुपये द्या अशी मागणी केली. दिवसभरात अनेक कॉल झाल्यानंतर शेवटी वीस लाख रुपयावर श्रीहरीची मुक्तता करण्याचे त्यांनी मान्य केले. दुपारी बारा वाजल्यापासून चालणारा हा थरार रात्री आठ-साडेआठ वाजेपर्यंत रोमांचकारी स्थितीमध्ये पोहोचला.. जीवन मरणाच्या लढाईमध्ये चिमुकल्याचा जीव वाचवण्याकरिता पोलीस प्रशासन खास करून पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल आणि फिल्डवर स्वतः अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री आयुष्य नोपानी जी जीवाचं रान करत होते. 
 अपहरणकर्त्यांची खात्री झाली की, संबंधित व्यक्ती पोलिसांशी संधान साधून नाही आहे. त्यांनी कृष्णाला वीस लाख रुपयांची खंडणी एका रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर घेऊन येण्याचे सांगितले. त्याचदरम्यान दुसऱ्या ठिकाणी श्रीहरीला एका गाडीमध्ये ठेवण्यात आले होते. पोलीस प्रशासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या अपहरणकर्त्यावर बारीक नजर ठेवून होते. पोलिसांची दोन पथके इमानेइतबारे डोळ्यात तेल घालून काम करत होती. एक पथक श्रीहरीच्या जीवाची रक्षा करण्याकरिता गाडीच्या भोवती जमा झाले होते. त्याच दरम्यान पैसे ठेवत असताना दोन आरोपींना जाग्यावर अटक करण्यात आली. तिसरा आरोपी हा श्रीहरीला घेऊन एका गाडीमध्ये बसल्याचे सांगितल्याबरोबर आहे त्या ठिकाणी श्रीहरीला कसलीही इजा न होऊ देता मुक्त करत पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 
           खरं म्हणजे मुजमुले कुटुंबासोबत माझं आणि देवेंद्रजींचं नातं अतिशय जुनं आहे. जून 2018 मध्ये कृष्णा मुजमुले यांची कन्या धनश्री मुजमुले हिची ह्रदय प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया आम्ही पार पाडली होती. मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख असताना माननीय फडणवीस साहेबांच्या मदतीने 25 लाख रुपये या शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. एका रात्रीत या चिमुकलीला हृदय प्राप्त झालं होतं. आणि त्याच दरम्यान एका रात्रीत रोमांचक पद्धतीने  25 लाख रुपये निधी जुळवत सकाळी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. धनश्री हिचा तो खरंच पुनर्जन्म होता.
             पहा, परत योगायोग कसा आला... गृहमंत्री देवेंद्रजी आणि मी आयुष्मानचा प्रमुख... परंतु मानवतेचा वसा आणि तितक्याच तत्परतेने पोलीस प्रशासनाने केलेली योग्य ती कारवाई याचा एकत्रित परिपाक म्हणून आज श्रीहरीचा पुनर्जन्म झाला. धनश्री आणि श्रीहरी या दोघां बहिणभावाच्या आयुष्यामध्ये आम्ही निमित्त झालोत, मात्र त्यांच्या पुनर्जन्माची संधी परमेश्वराने आम्हाला प्राप्त करून दिली.. रेस्क्यू मिशन संपूर्ण झाल्याबरोबर जयकुमार बंसलजी आणि आयुष नोपानी जी यांनी तात्काळ मला कॉल केला.. आयुषजी चक्क भावनावश होत डोळ्यातून अश्रू गाळत मला बोलत होते... मी तर दुपारपासून कित्येक वेळा अश्रू ढाळलेत. वारंवार परमेश्वराकडे प्रार्थना केली होती की, श्रीहरीच रक्षण आता तूच कर..! दिवसभराच्या कामात प्रचंड व्यस्त असताना देखील देवेंद्रजींनी दोन वेळेस पोलीस अधीक्षकांशी स्वतः संपर्क केला होता.. मी तर दिवसभरात प्रत्येक मोहिमेच्या भागावर बारीक लक्ष ठेवून होतो..
शेवटी कृष्णाचा कॉल आला, आनंदाने अश्रूला वाट मोकळी करत म्हणाला, "साहेब, देवेंद्रजी व तुमचे कसे उपकार फेडू?  कुठल्या जन्माच्या पुण्याईने आपल्या दोघांच्या सहवासात आम्हाला येता आलं? आणि माझ्या दोन्ही मुलांचा जीव आपण वाचवला. मी आता उपकार कसे फेडू ? असं म्हणत तो धाय मोकलून रडत होता.. मीही हमसून रडलो... परंतु अश्रू आनंदाचे होते..!
                         - डॉ.ओमप्रकाश शेटे