From blogs

जय हिंद-जय महाराष्ट्र

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Jan 06, 2024

आदरणीय ना.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशावरून आयुष्मान भारत-मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख म्हणून नुकतीच जवाबदारी स्विकारली. देशपातळीवरील एखाद्या योजनेची राज्यात विशेष समिती करण्याचा पहिला प्रयोग महाराष्ट्र राज्य करत आहे. उपलब्ध साधन सुविधांचा वापर करुन आहे त्या मनुष्य बळाच्या सहयोगाने एवढे मोठे उद्धिष्ठ साध्य करणे सोपी गोष्ट नाही हे मी जाणून होतो. परंतु मागच्या सरकारच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील अनुभवाच्या शिदोरीवर हे शिवधनुष पेलण्याचा मी निश्चय केला आहे.

'जीवनदायी भवन' या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील वातानुकुलीत ऑफिसमध्ये कामाची औपचारिकता न करता मी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्यात जाऊन आरोग्य यंत्रनेची माहिती गोळा करत आहे. अधिकारी, हॉस्पिटल प्रशासन, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, रुग्ण व सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत आहे. रुग्णांसोबतच दवाखान्याच्या सुद्धा अडचणी समजून घेणे आवश्यक आहे, कारण रुग्णालये जिवंत राहिली तरच रुग्ण वाचतील असं माझं प्रामाणिक मत आहे. अनेक जिल्ह्याचा हजारो किलोमीटर चा प्रवास करुन न थकता मंगळवारी दिल्ली गाठली. 

केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे. राज्य शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख व केंद्रीय आरोग्य तथा आदिवासी राज्यमंत्री डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांचा सहाय्यक सचिव अशा दोन्ही भूमिका पार पाडत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर योजनेचा लाभ राज्याला देण्यासाठी दि. ४ व ५ जानेवारी रोजी झालेल्या संयुक्त बैठकीचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य प्रामुख्याने मला लाभले. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातील आरोग्यमय भारत ही संकल्पना शेवटच्या घटकापर्यंत नेण्याकरिता या योजनेचा एक पाईक म्हणून प्रतिनिधित्व करणे हा एक वेगळाच आनंद व आव्हान पण आहे.

बुधवार दि. 4 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेसात पर्यंत म्हणजे तब्बल साडेनऊ तास बैठकीचे सत्र चालले. तसेच दि. 5 जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास चार तास बैठकीचे सत्र सुरु होते. सन २४-२५ व २५-२६ या दोन आर्थिक वर्षाची आरोग्य विषयाची निधीची तरतूद व नियोजन या बैठकीत करण्यात आले. देशातील प्रत्येक नागरिकाला सहज व सुलभ आरोग्यसेवा देण्याबाबत केंद्र व राज्य सरकार आग्रही आहे. त्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजना व अंमलबजावणी याबाबत बैठकीत गंभीर चर्चा झाली.

केंद्रीय अतिरिक्त सचिव सौ. वंदना पटनाईक, अनेक केंद्रीय सहसचिव, राज्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान चे आयुक्त श्री धीरज कुमार यांच्या समवेत अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. मला केंद्र व राज्य सरकार यांचे संयुक्त प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले. महाराष्ट्रातील आरोग्य सेवा एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे आपले ध्येय आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या खिशात एटीएम सारखे 'हेल्थ कार्ड' असले पाहिजे व त्याला जवळच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी लागणाऱ्या निधी व साधन सामुग्रीची पुरेशी व्यवस्था केंद्र सरकार करेल यात शंका नाही. सरकार व अधिकारी यांची सकारात्मक मानसिकता असल्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी भरघोस निधी प्राप्त होईल अशी आशा आहे..!

- डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे