From blogs

मैत्री दिनाची अनोखी भेट....

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Aug 06, 2023

आज मैत्री दिन... परंतु खरं पाहिलं तर मैत्रीला 'दिवस - रात्र' असं काहीही नसतं. इतकच नाही तर मैत्रीत गरीब - श्रीमंत, उच - नीच', 'हलका - भारी', 'साधाभोळा किंवा बुद्धिमान' असा काहीही भेदाभेद नसतो. मनाला एक सुंदर, अनामिक ओढ लावणारं नातं म्हणजे मैत्री. मैत्रीपूर्ण नातं कधीही विसरता येत नाही. ते कायम सोबत असतेच. मैत्री हा शब्दच आल्हाददायक आणि आनंद देणारा आहे. मैत्री दिनाच्या निमित्ताने आज संयोगाने जिवलग मित्र श्रीहरी पारेकर यांना आगळे वेगळे 'गिफ्ट'भेट देण्याचा योग जुळून आला. साक्षात देवेंद्र भाऊंच्या भेटीने आजचा मैत्री दिन खऱ्या अर्थाने अजरामर झाला. 

श्रीहरी पारेकर हा माझा जिवाभावाचा मित्र. खानदानी शेतकरी असलेला श्रीहरी 'आपण भलं आणि आपलं काम भलं' असं साधं सुधं जीवन जगणारा प्रामाणिक माणूस. मागच्या काही वर्षांपासून पंढरीची पायीवारी तो न चुकता करतो. यावर्षी आम्ही दोघेही माऊली व तुकोबांच्या सोहळ्यात सहभागी झालो होतो. समाजकारण - राजकारण याचं काहीही देणंघेणं नसलं तरी एखाद्या घटनेचे तटस्थपणे विश्लेषण करणारा बुद्धिजीवी नागरिक. माझ्या सुखात आणि दु:खात कायम सोबत राहिल्यामुळे तो माझा 'प्रिय' आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता निरंतर पाठीशी असलेल्या या मित्राला आज अनोखी भेट देण्याची संधी मला प्राप्त झाली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजकारणातला चाणक्य म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबां सोबत श्रीहरीची भेट घालून दिली. साहेब मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मी संतशिरोमणी शिवयोगी मन्मथस्वामींना साकडे घातले होते. माझ्या समवेत दिंद्रुड ते कपिलधार अशी शंभर किलोमीटरची पायी वारी करणाऱ्या श्रीहरीचा साहेबांना परिचय करुन दिली. ओळखपालक व काहीही देणे घेणे नसताना आपल्यासाठी शेकडो किलोमीटरची पायी वारी करणाऱ्या श्रीहरीची साहेबांनी कौतुकाने पाठ थोपटून आनंदाने हस्तांदोलन केले. साहेबांच्या भेटीने श्रीहरीच्या चेहऱ्यावर उमटलेले 'भाव' शब्दात वर्णन करता येणे कठीण आहे. मात्र मैत्री दिनाच्या निमित्ताने त्याला मिळालेले ही गिफ्ट त्याच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असेल...!

मैत्री ना सजवायची असते,

ना गाजवायची असते,

ती तर नुसती रुजवायची असते ….!

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो

ना जीव घ्यायचा असतो इथे

फक्त जीव लावायचा असतो …!!

✨Happy Friendship Day.✨

- डॉ. ओमप्रकाश स शेटे