From blogs

गुणवंतांचा गुणगौरव : सामाजिक दायित्व..!

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Jun 29, 2023

नुकततेच इयत्ता दहावी, बारावी व नीट परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने 'ॐ साईशिल्प' येथे करण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी हेच खरे आपले सामाजिक दायित्व आहे.

दिंद्रुड येथे देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू खांडेकर यांच्या कुशल नियोजनात गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडला. माझी अर्धांगिनी सौ शिल्पा शेटे हिने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवले. विशेष म्हणजे तिने विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन देखील केले. सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीभाऊ रांजवन,सिद्धेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश गटकळ, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्क प्रमूख अनिल महाजन, उद्योजक तथा व्यंकटेश पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप ठोंबरे, सरपंच भगवानराव कांदे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा आणखीच वाढली. 

दिंद्रुड पंचक्रोशीतील ऋषिकेश सुंदर कटारे, ऋषिकेश विष्णुपंत तिडके, प्रतीक वैजनाथ वनवे, वैष्णवी अमरनाथ गवरकर, बसवलिंग देवराव पत्रावळे, तुषार जगन्नाथ वनवे या नीट परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सोबतच इयत्ता दहावी परीक्षेत 90 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला. बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांसोबतच गावाचा व पंचक्रोशी चा मानसन्मान वाढवला आहे. सत्कारातून सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळते, म्हणून विद्यार्थ्यांचा गौरव करणारे सन्मान सोहळे ठिकठिकाणी झाले पाहिजेत अशी प्रांजळ अपेक्षा सौ.शिल्पा हिने आपल्या भाषणात व्यक्त केली. 

आज-काल समाजामध्ये आत्मकेंद्रीय भरती वाढत असून सामाजिक जाणीव बोथट होत आहेत. सामाजिक व लोकहिताची कामे करण्यासाठी शक्यतो कोणीही पुढे येताना दिसत नाहीत. स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रचंड धावपळ करताना लोक स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. कुटुंब, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडे सुद्धा पाहायला अनेकांना वेळ नाही. मात्र अशा व्यक्ती सुखी आणि समाधानी राहु शकत नाहीत. त्यामुळे इतरांच्या सुखात आपले सुख शोधले पाहिजे. आजचे गुणवंत हे देशाचे भविष्य आहेत. उद्या तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा, परंतु आपण ज्या समाजातून व ज्या घटकातून आलो त्यांना आयुष्यात कधीही विसरू नका. आयुष्याच्या शेवटपर्यंत सामाजिक दायित्व जपा अशी माफक अपेक्षा मी माझ्या भाषणात व्यक्त केली. आपल्या पाल्यांचे होतं असलेले कोडकौतुक पाहण्यासाठी शेकडो पालक व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पतीच्या निधना नंतर अतिशय कष्ट व परिश्रम घेऊन तिन मुलांना एमबीबीएस डॉक्टर बनवणाऱ्या श्रीमती सविता सुंदर कटारे व दोन्ही मुलांना एमबीबीएस करणाऱ्या श्रीमती शोभा छगन चौरे या माउल्यांच्या जिद्दीला व धाडसाला त्रिवार नमन.

- डॉ. ओमप्रकाश शेटे