From blogs

ऍड.एकनाथराव आवाड नावाचा कर्मवीर

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Apr 20, 2023

दत्ता आवाड या चळवळीतल्या कार्यकर्त्याने ऍड एकनाथराव आवाड यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. जिजा अर्थात आवाड साहेब आमचे मार्गदर्शक तथा समाजकारण व राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मी क्षणाचाही विचार न करता स्वीकारले. या कार्यक्रमात हजरजबाबी व एव्हरग्रीन नेते ना. रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातल्या दुकडेगाव येथे दिवंगत एकनाथराव आवाड यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांनी मानवी हक्कांच्या जपवणुकीसाठी आयुष्य वेचले. पालावरच्या फाटक्या माणसालाही स्वाभिमानाची भाषा शिकवली. एकनाथ आवाड हे केवळ एका नेतृत्वाचे नाव नसून ती एक चळवळ झालेली आहे. 

त्याअनुषंगाने त्यांच्या प्रखर मानवतावादी विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. अॅड.एकनाथराव आवाड यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकाला संदेश देणारे आहे. आंबेवडगावच्या ग्रामसभेपासून ते जिनिव्हातील मानवी हक्क संरक्षण परिषदेतही तेवढ्याच पोटतिडकीने बोलणारे जिजा एक चळवळ होते. पालावरच्या भिल्ल, पारधी, कोल्हाटी जमातींनाही 'झिंदाबाद' बरोबरच 'जय भीम' शिकवणारे 'जिजा' सच्चे आंबेडकरी विचारांचे पाईक होते. 

आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी हा नारा घेऊन मानवी हक्क अभियानने मानवतावादी विचारांची पेरणी केली. मानवी हक्क अभियानचे कार्यकर्ते 'झिंदाबाद' बरोबरच 'जयभीम'चाही नारा देत असत. अन्याय सहन करायचा नाही, त्यासाठी कशाचीही पर्वा न करता वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी जिजांच्या ठायी होती. जिजांनी 'संघर्षात्मक' आणि 'रचनात्मक' अशा दोन्ही पातळीवर चिरकाल टिकणारे काम उभा केले आहे. सामाजिक क्षेत्रात जागतिक पातळीवर उंची गाठून सुध्दा त्यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला. त्या पक्षाने त्यांची कायम उपेक्षा केली असेच खेदाने म्हणावे लागेल.

जिजांचे चिरंजीव मिलिंद आवाड हे सुद्धा उच्च विद्या विभूषित असून वडिलांचा वारसा सक्षमपणे सांभाळत आहेत. जिजांच्या जाण्याने बीड जिल्ह्याची अपरिमित हानी झाली आहे. लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब व ऍड. एकनाथराव आवाड यांनी आपापल्या पातळीवर केलेले कार्य आम्ही चंद्र सूर्य असेतोवर विसरू शकत नाही.

- डॉ.ओमप्रकाश स शेटे