From blogs

मी उद्योजक होणारच...

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Mar 27, 2023

मुळात माझा 'पिंड' हा उद्योजकाचा आहे. त्यातच मला समर्थ सातारा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात 'मी उद्योजक होणारच' या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. तसं तर विषय कोणताही असो, समोर दर्दी प्रेक्षकांची गर्दी असली की माझ्यातला वक्ता जागा होतो. आणि त्यातच विषय आपल्या आवडीचा असेल तर सभा गाजवायला व विषय रंगवायला आणखी मजा येते. 

रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी रवींद्र नाट्यगृह प्रभादेवी, मुंबई येथे समर्थ सातारा प्रतिष्ठानच्या वतीने नव उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी भव्य मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्यासह खादी आणि ग्रामोद्योग भारत सरकार चे संचालक योगेश भामरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं होत. मागच्या अनेक वर्षांपासून मी एक अधिकारी म्हणून महाराष्ट्र आणि दिल्लीत सेवा करत आहे. परंतु या संस्थेचे अध्यक्ष उद्योजक श्रीरंग केरेकर यांनी मी पूर्वी उद्योजक असल्याची माहिती सैनिक मित्र अशोक कदम व पोलीस मित्र रमेश देवरे यांच्या माध्यामातून काढली आणि मलाही या शिबिरात नवउद्योजकांशी हितगुज करण्यासाठी आग्रह धरला. 

प्रा. नितीन बानगुडे पाटील हे माझे जेष्ठ बंधु डॉ. शिवरत्न शेटे यांचे खास स्नेही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका प्रतिभावंत वक्त्याचे विचार ऐकायला मिळाले. तरुणांच्या उन्नतीसाठी असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती खादी आणि ग्रामोद्योगचे संचालक योगेश भामरे यांच्याकडून ऐकायला मिळाली. या कार्यक्रमात बोलतांना मी सुद्धा मागील आयुष्यात घडलेल्या अनेक बऱ्या वाईट घटनांच्या आठवणीत रमलो.

लहानपणापासूनच स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवायचे ही उर्मी अंगात होती. नागपूरला जाऊन तेथील एका टायर रिमोल्डिंगच्या कंपनीत साध्या वर्कर प्रमाणे राहून काम शिकलो. तिथे असेपर्यंत मी एका सधन कुटुंबातील आहे हे कोणालाही माहीत नव्हते. त्यानंतर स्वतःचा टायर रिमोल्डिंग चा व्यवसाय सुरू केला. आणि या व्यवसायात चांगला जम सुद्धा बसवला. परंतु हे करत असतानाच एका व्यक्तीच्या सल्ल्याने 'ऍग्रोकोल इंडस्ट्रीज' टाकण्याचा निर्णय घेतला. लाखो रुपयांचे कर्ज घेऊन इंडस्ट्री उभा देखील केली. मात्र मशीन पुरवठा करणाऱ्या व्यक्तीने फसवणूक केली. एकीकडे कंपनी चालू होत नव्हती तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतच होता. एका व्यवसायात कमावलेले सर्व पैसे नव्या व्यवसायात गमवून बसलो होतो. काय करावे सुचत नव्हते, नवीन काही करण्याच्या नादात हातात होते ते सुद्धा गमावून बसलो. मती गुंग झाली होती, डोके चालत नव्हते परंतु मला तारले ते छत्रपती शिवाजी महाराज या तीन अक्षरी मंत्राने...

व्यवसायासाठी आपण तर केवळ आपली प्रॉपर्टी तारण ठेवतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाला तारण ठेवले होते हे उदाहरण पावलोपावली प्रेरणा देत होते. हतबल झालो किंवा नकारात्मक विचार मनात येऊ लागले तर शिवरायांचे चरित्र वाचायचे, कितीही संकटे आली तरी तिला पुरून उरायचे अशी शिकवण बंधुराज सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी दिलेली असल्यामुळे न डगमगता आयुष्यात पुन्हा उभा राहिलो.

कोणताही व्यवसाय अथवा उद्योग करायचा असेल तर त्या विषयातील पुरेपूर ज्ञान असायला हवे. त्यातही जो आपल्या आवडीचा विषय आहे, ज्यात आपल्याला पैशासोबतच आनंद मिळू शकतो अशा उद्योगधंद्याची निवड करावी. लिखोटी, हातोटी आणि सचोटी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोणताही व्यवसाय केला तर त्यात हमखास यश मिळते अशी शिकवण माझे वडील नेहमी द्यायचे. संघर्ष व मेहनत करण्याची तयारी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेते यात तिळमात्र शंका नाही. मलाही जर माझ्या व्यवसायात अडचणी आल्या नसत्या, मला संघर्ष करायची गरज पडली नसती तर मी सुद्धा इथपर्यंत प्रगती करू शकलो नसतो. कारण आपल्यावर आलेली 'वेळ' आपल्याला मार्ग शोधायला भाग पाडते. वारंवार येणारी संकटे तुम्हाला आणखी मजबूत करतात. त्यामुळे तरुणांनी खचून न जाता हिमतीने परिस्थितीला सामोरे जावे व स्वतःच्या पायावर उभा राहून व्यवसाय उद्योगाची निर्मिती करावी. कारण संत महंतांची आपल्याला शिकवण आहे, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. स्वामी विवेकानंद सांगतात की, 'युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील.' मला जर 'धाडस' करायचे असेल तर मी प्रतापगडावर जातो आणि एखादी कोंडी फुटत नसेल तर पन्हाळ्यावर जातो. कारण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे 'गड' तुम्हाला जगण्याची प्रेरणा व दिशा देतात असा माझा अनुभव आहे.

- डॉ.ओमप्रकाश स.शेटे