From blogs

सुखद योगायोग : उभयतांना पुरस्कार

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Mar 14, 2023

आरोग्यसेवेचे व्रत घेतल्यापासून महाराष्ट्रात अनेक नामांकित संस्था व व्यक्तींनी त्याची दखल घेतली. अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित करुन पाठीवर कौतुकाची थाप टाकली. आरोग्यसेवेचा यज्ञ अखंड तेवत ठेवतांना शिल्पा खंबीरपणे सोबत उभी राहिली हे वेगळे सांगायला नको. माहेरहून येतांना सोबत समाजसेवेचे 'वाण' घेऊन आलेली अर्धांगिनी घरात प्रचंड काम असतानाही सामाजिक 'भान' जपत आहे. साहजिक ती सुद्धा विविध पुरस्कारांची 'मानकरी' ठरली आहे. मात्र काल चा योगायोग हा आमच्या दोघांसाठी अतिशय सुखद असाच आहे. कारण एकाच दिवशी व एकाच वेळेला आम्हा दोघांना पुरस्कार प्रदान केले जात होते.

मला मिळालेल्या प्रत्येक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिल्पा आवर्जून हजर असते. पण शिल्पा चा एवढा मोठा सन्मान होत असताना मला उपस्थित राहता आलं नाही याची मनाला थोडीशी रुखरुख वाटते. खरं तर मला मिळालेल्या प्रत्येक पुरस्कारात माझ्यापेक्षा शिल्पाचा सिंहाचा वाटा आहे. मी तर मा. देवेंद्रभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवेसाठी स्वतःला समर्पित केले आहे. परंतु माझ्या पश्चात नातेवाईक, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांचे सर्व कार्यक्रम व त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी ती वेळ देते. तिला मिळालेला पुरस्कार हा तिच्या त्याग, समर्पण व सेवे चा सन्मान आहे. बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या नामांकित संस्थेने आज शिल्पाला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला. ही संस्था गेली पाच दशकाहून अधिक काळ शेती, शेतीपूरक व्यवसाय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहिली आहे. खेडेगावातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी शिक्षणाचे दालन खुले व्हावे या उद्देशाने शारदानगर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आहे. संस्थेच्या वतीने गेली सतरा वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी हा कार्यक्रम 13 मार्च 2023 रोजी पार पडला. या कार्यक्रमामध्ये समाजासाठी असामान्य कर्तुत्व करणाऱ्या महिलांची निवड करण्यात येते. कार्य कर्तुत्वाचा आलेख पाहून संस्थेने या सत्कारासाठी शिल्पाची निवड केली. आप्पासाहेब पवार सभागृह, शारदानगर शैक्षणिक संकुल, शारदानगर, बारामती येथे संपन्न झालेल्या या देखण्या सोहळ्यात मा.सुनंदा राजेंद्रजी पवार (आ. रोहितजी पवार यांच्या मातोश्री) व सकाळ वृतपत्र समूहाचे संपादक संदीप काळे पूर्णवेळ उपस्थित होते.

संत वीरशैव समाज पंचमंडळ श्री क्षेत्र पैठण जि.छत्रपती संभाजीनगर या धार्मिक पिठाच्या वतीने मला "महाराष्ट्राचा आरोग्यदूत पुरस्कार" प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री क्षेत्र पैठण नगरीचे नगराध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे, भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ.सुनील शिंदे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष बंडुजी खांडेकर, भाजपाचे युवा कार्यकर्ते संतोष जाधव, संत वीरशैव समाज पंचमंडळाचे अध्यक्ष रायभानजी बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांच्या पुण्यभूमीत मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. तर पवार कुटुंबियाकडून व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्याकडून शिल्पाचा झालेला सन्मान हे आम्हा उभायतांना एकाच दिवशी योगायोगाने मिळालेले 'गॉडगिफ्ट'च म्हणावे लागेल. सद्गुरुंचे आशीर्वाद, थोरामोठ्यांची शिकवण व आईवडिलांचे संस्कार घेऊन आयुष्यात गरजवंत लोकांसाठी खूप काही करायचं आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले व पुढेही मिळतील मात्र काल झालेला पुरस्कार सोहळा आमच्या दोघांसाठी निश्चितच अविस्मरणीय असेल. कारण मी शरीराने पैठण मध्ये तर शिल्पा बारामती मध्ये होती. आमच्या दोघांची मनं मात्र एकमेकांच्या कार्यक्रमात 'गुंतली' होती.

- डॉ. ओमप्रकाश शेटे