From blogs

तनात, मनात व नसानसात भिनलेले श्रीमंत योगी...राजे त्रिवार मुजरा..!

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Feb 19, 2023

महाराजांची जयंती म्हटलं की, अंगात सळसळतो जाज्वल्य हिंदुत्वाचा हुंकार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, पराक्रम व प्रजेप्रति असलेली प्रचंड निष्ठा जगात कोणत्याही राजाकडे नव्हती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जसे श्रीकृष्णाला 'सहस्त्र' नावाने संबोधित केले जाते तसेच शिवरायांना सुद्धा इतिहासकारांनी 'अगणित' विशेषणे लावून अलंकारित केले आहे.

'प्रजाहितदक्ष राजा' म्हणून जगात ख्याती असलेल्या महाराजांना जयंती निमित्ताने प्रातःसमयीच साष्टांग प्रणिपात केला. तसं तर छत्रपतींना प्रणाम करुन, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझ्या दैनंदिन जीवनातील कामकाजाला सुरुवातच होत नाही. पण जयंतीनिमित्त सौ.शिल्पासह घरातील सर्वांना सोबत घेऊन 'राजाधिराज' महाराजांना अभिवादन केले. नवीन बांधलेल्या 'ॐसाईशिल्प' या निवासस्थानात आम्ही नीतीवंत,पुण्यवंत व किर्तीवंत आशा 'जाणत्या राजा' साठी विशेष कक्ष बनविला आहे. अनेकांना शिवरायांच्या जन्मदिनी त्यांचा पुतळा व फोटो यांची आठवण होते. मात्र निश्चयाचा महामेरु व बहुतजनांशी आधारु असलेल्या श्रीमान योगी महाराजांचा कायमस्वरूपी पुतळा मी बैठकीतच प्रतिस्थापीत केला आहे. जो मला नितदिन नैतिकता, प्रामाणिकपणा व कर्तव्याची जाणीव करुन देतो. 

सकाळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन दिंद्रुडच्या पत्रकार संघाचे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाला हजेरी लावली. माजलगाव येथे शिवजन्मोत्सवा निमित्ताने सचिन कराळे या शिवभक्ताने व त्याच्या सहकारी मित्रांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांच्या स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर तसेच मोटारसायकल रॅलीचेही आयोजन केले. या रॅलीत मोटारसायकलवर बसून स्वतः सहभाग नोंदवला. सळसळत्या रक्ताच्या तरुणाई समवेत रॅलीतील सहभागाचा अनुभव हा खरंच विलक्षण होता. दै.कार्यारंभ चे संपादक मा. शिवाजीभाऊ रांजवण, युवानेते मनोजतात्या जगताप, मित्रवर्य बंडूजी खांडेकर, सचिन कराळे, शंकर कदम, आकाश शिंदे, शरद सोळंके, अशोक वाडेकर, सचिन शेजुळ, मनोज कोरडे आदी हजारो शिवभक्त हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते.

बाळू ताकट नावाचा युवक हा 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' या सुभाषिताला साजेसा आहे. दरवर्षी तो छत्रपती शिवरायांच्या विचारांना अभिप्रेत असलेली शिवजयंती साजरी करतोय याचा मनोमन आनंद आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या युवकाने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाजातील गोरगरीब मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात लावून दिले. या बहाद्दराने आजपर्यंत आठ सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून ५२६ मुला मुलींचे 'कन्यादान' केले आहे.

ढोलताशांचा गजर, हलगीचा नाद, संभळ वादनाने दुमदुमून गेलेला आसमंत, बाहुबली हनुमानाचा देखावा व पारंपरिक वाद्यांसह 'महाराजांची' निघालेली भव्य मिरवणूक अभूतपूर्व अशीच होती. भव्य दिव्य 'शोभायात्रा' पाहण्यासाठी जमलेल्या अलोट गर्दीने जणू 'शिवसागर' उसळला असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा चैतन्यपूर्ण वातावरणात माजलगाव येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात २१ जोडपी विवाहबध्द झाली. विवाहासाठी किल्ल्याची प्रतिकृती असलेला भव्य सेट उभारण्यात आला होता. महाराजांच्या जयंतीदिनी त्यांच्या वैभवाला साजेसा देखणा सोहळा डोळे भरुन पाहण्यासाठी व बाळू ताकट ला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यंदा ही शिवजयंती आपल्या जिवाभावांच्या माणसांसमवेत साजरी करता आली याचा विशेष आनंद आहे.

|| जय जिजाऊ - जय शिवराय ||