From blogs

अन कॉलेजच्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या...!

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Sep 27, 2022

पाहता पाहता कॉलेजचे वय कधी निघून जाते समजत सुद्धा नाही. त्या आठवणी, खोडकर मित्र, खट्याळ मैत्रिणी, शिस्तप्रिय प्राचार्य, विविधांगी स्वभावाचे प्रेमळ व रागीट 

असे संमिश्र प्राध्यापक यांच्या एक एक आठवणी मागे टाकत जवाबदारीच्या विश्वात कधी पोहोचलो हे कळतच नाही. पण कामाच्या व्यापात या मधुर आठवणी शिनभाग विसरवायला लावतात हे मात्र नक्की..!

अनेकजण नोकरी, कुटुंब, बॉस, कामे, सुख- दुःख इतर कामाचा डांगोरा पिटत रडत - पडत आयुष्य जगताना आपण पाहतो, पण मला हे बिलकुल आवडत नाही. वरील सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत यात वादच नाही. पण आपले आयुष्य त्यापेक्षा नक्कीच अनमोल आहे. संसाराच्या व कामकाजाच्या व्यापातही माणसाला स्वतः साठी जगता आलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतांना मी स्वतः वर कधीही अन्याय होऊ देत नाही.

काल दुपारी अचानक अंबाजोगाई वरुन आश्विन जाधव (बाबा) याचा फोन आला. मैत्रीच्या अधिकाराने त्याने आदेशच दिला," ओम, आज,आत्ता,ताबडतोब तुला अंबाजोगाईला यावंच लागतंय, सगळे दोस्त वाट पाहत आहेत." नवरात्रीचे दिवस असल्याने माझ्या डोळ्यात नकळत योगेश्वरी देवीची प्रतिमा तरळून गेली. मी क्षणाचाही विलंब न लावता " हो, लगेच निघतो..!" असं म्हणालो. हातातील सर्व कामे गडबडीत उरकली व सोबत शिल्पा, बंडू, श्रीहरी व नागेश यांना घेऊन अंबानागरीचा रस्ता धरला. 

जवळपास पोहचल्यावर बाबाचा परत फोन आला, म्हणाला की, "आम्ही सर्वजण योगेश्वरी कॉलेजच्या गेटवर थांबलोय तू सरळ इकडेच ये..!" आता हे काय नवीनच? असा प्रश्न मनात आला पण तिकडे का? असं विचारायची माझी हिम्मत झाली नाही. तिथं पोहोचलो तर गेटवरच त्याकाळचे सर्व बदमाश पण मनाने निर्मळ असलेले दोस्त वाट पाहत शिस्तीत उभे दिसले. मी गाडीतून उतरल्यावर पहिल्यांदा सांगितले की, "मी इथे अधिकारी म्हणून नाही तर मित्र म्हणून आलोय..!" तेंव्हा कुठे ते 'साहेब' वरुन 'ओमप्रकाश' वर आले.

योगेश्वरीच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर मी सर्व कॉलेज आधाशासारखे डोळ्यात साठवत होतो. काटे मामाची कॅन्टीन, प्राचार्य सरांचे ऑफिस (आता जागा बदलली आहे), आमची वर्गखोली, बसायचा डेक्स (त्यावर लिहायचं नसतंय हे आता कळतंय), जुनी व नवी इमारत, त्यावेळेसची छोटी पण आज मोठी झालेली झाडे, हॉस्टेल, ग्रंथालय, स्टेज या प्रत्येक गोष्टीशी काहीतरी नातं असल्याची जाणीव इथं फिरताना वारंवार होत होती. या प्रत्येक ठिकाणची काही ना काही आठवण व घडलेली घटना (इव्हन्ट) डोळ्यासमोर येत होती. मी 30 वर्षांपूर्वीच्या आठवणीत पूर्ण गढून गेलो, सोबत शिल्पा आहे याचेही भान राहिले नाही. आश्विन जाधव, राहूल देशमुख, सचिन कर्नावट, पंकज लोमटे, संतोष गवारे, महेंद्र आचार्य, कांचन रेणापूरे, पिंटू लोढा या मित्रांनी मला वेगळ्या विश्वात नेले होते.

जसा मला माझ्या कॉलेज व शिक्षकांविषयी कायम आदर आहे, साहजिकच कॉलेजलाही आपला विद्यार्थी मोठया पदावर जाऊन जनसेवा करतोय याचा अभिमान असणारच यात शंका नाही. पोरांनी मी कॉलेजमध्ये येणार आहे असे सांगितल्यामुळे प्राचार्य व अनेक प्राध्यापक उशीर झाला तरी वाट पाहत थांबले होते. मला पोहचायला उशीर झाल्यामुळे मला अवघडल्यासारखे झाले. पण माझ्यावर योग्य संस्कार करुन मला देशभक्ती, लोकसेवा व गरजवंताच्या पाठीशी उभा राहण्याची प्रेरणा देणाऱ्या गुरुजनांचा दर्शनाने धन्य झालो. त्यांनी केलेला सत्कार मला वेळोवेळी माझ्या कर्तव्याची जाणीव करुन देत राहील. त्यांचे आशीर्वाद मला अन्याय, अनीती व अनाचाराच्या विरोधात लढण्यासाठी बळ देतील. थोर स्वातंत्र्य सेनानी व हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत व त्यांच्या नावाने असलेल्या या संस्थेचे सचिव सन्माननीय गणपतजी व्यास, प्राचार्य आर.जी. जोशी, उपप्राचार्य आर. व्ही. कुलकर्णी, प्रा.पी.जी. पिंगळे यांच्यासह अनेक प्राध्यापक व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना या कॅम्पसमध्ये वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासोबतच संस्थेच्या संस्थापकांचे स्वप्न साकार करण्यासाठी यथाशक्ती सहकार्य व प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

सळसळत्या तरूणाईच्या आवेशात जगलेला तो काळ व मंतरलेले ते दिवस पुन्हा पुन्हा आठवतांना तिथेच पाय अडखळत होते. जड पावलांनी कॉलेजच्या प्रांगणाबाहेर पडतांना मन तिथेच घुटमळत होते. पण म्हणतात ना आठवणी आपल्याला नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा देतात. त्याच आठवणींची शिदोरी व गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन परतीचा मार्ग धरला.

- डॉ.ओमप्रकाश स. शेटे