From blogs

जन्मभूमीतील साहित्यसाम्राटांचा अविस्मरणीय जन्मोत्सव....

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Aug 21, 2022

कामाचा व्याप वरचेवर वाढत असल्याने मागच्या अनेक वर्षांपासून गावातील कोणत्याही जयंती उत्सव कार्यक्रमास जाणे झाले नाही, ही हुरहूर मनात बऱ्याच दिवसांपासून होती. कारण लहानपणी वैजनाथ नाना नागपूरे यांच्या सहवासात शिवशंकर काटकर यांच्या नेतृत्वाखाली निघणारी शिवजयंती जवळून पाहायचो. दिनेश देशमाने यांच्या पुढाकाराने भीमजयंती साजरी व्हायव्ही. मागच्या काही वर्षात सर्वच महापुरुषांच्या जयंत्या गावात साजऱ्या केल्या जातात. मी कार्यक्रमाला यावं असा सर्वांचा आग्रह असतो मात्र कामाची जवाबदारी वाढल्याने शक्य होत नव्हते.

बाबा कांबळे व अतुल चव्हाण या दोन तरुणांनी यंदा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे गावात आयोजन केले आणि मी आलंच पाहिजे असा हट्ट धरला. मी लगेच 'हो,येतो' म्हणालो. दोन - तीन दिवसांच्या सलग सुट्या असल्याने श्रीक्षेत्र महाबळेश्वर चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलो. थेट तिथूनच गावी येण्याचा बेत आखला. जयंती 30 तारखेला असल्याने 29 रोजीच महाबळेश्वर सोडले व गावाकडे निघालो. वाटेत असतानाच 'बॉस' ने मुंबईला बोलावले असल्याचा निरोप आला. 

पुण्यातून दिंद्रुड ऐवजी मुंबईचा रस्ता पकडून राजधानी गाठली. यावर्षी ठरउन सुद्धा गावाकडे जयंतीला जाता येणार नाही, याच वाईट वाटलं. पण बाबा कांबळे व अतुल चव्हाण यांनी 'आम्ही पंधरा दिवसांपासून खूप मेहनत घेतली आहे. गावागावात जाऊन तुम्ही येणार आहेत असं सांगितलं आहे. तेंव्हा काहीही करुन तुम्ही आलंच पाहीजे..! तुम्ही आल्याशिवाय आम्ही कार्यक्रम सुरु करणार नाही अशी प्रेमाची धमकीच दिली. मुलांची तळमळ व कार्यक्रमासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता डोळ्यासमोर आठवून मी गावी जाण्याचा निर्धार केला.

गाठी भेटी उरकून साडेपाचचे विमान पकडून संभाजीनगर ला पोहोचलो व तेथून थेट दिंद्रुड गाठले. खरच आठ वाजून गेले तरी पोरांनी कार्यक्रम सुरु केला नव्हता. आपल्या जादुई आवाजाने तरुणाईला वेड लावणाऱ्या राधा खुडे या सुप्रसिद्ध गायिका मंचावर येऊन बसल्या होत्या. मुलांनी हालगीच्या कडकडाटात माझं जे स्वागत केलं ते अविस्मरणीय होतं. त्यांचा सळसळता उत्साह पाहून असं वाटलं की मी आलो नसतो तर संयोजकांवर खूप मोठा अन्याय झाला असता.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस अभिवादन केले. दीड दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 15 कथा संग्रह, 35 पटकथा, दहा पोवाडे, अनेक चित्रपट,प्रवासवर्णन, कथा एवढे विपुल साहित्य निर्माण करणारे आण्णाभाऊ खऱ्या अर्थाने साहित्यसम्राट असल्याचे सांगितले.

त्यांची लोकप्रिय फकीरा ही कादंबरी त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केली होती. ती 25 भाषात भाषांतरित झाली. तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर भारताबाहेर (रशियामध्ये) पोवाडा गाणारे आण्णाभाऊ साठे हे एकमेव शाहीर असल्याचेही मी माझ्या भाषणात आवर्जुन सांगितले.

बाबा, अतुल, नवनाथ, बाबू, आदी तरुणांनी गुलाबांच्या भव्य पुष्पहाराने केलेल्या स्वागताने अक्षरशः भारावून गेलो. 'सूर नवा ध्यास नवा' या गितमालिकेतील राधा खुडे हिचा मराठी अस्मिता जपणाऱ्या व समाज प्रबोधनपर सदाबहार गीतांचा प्रेक्षकांमध्ये बसून पत्रकारांच्या समवेत आनंद घेतला. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, कारण कित्येक वर्षानंतर जमिनीवर बसून ठसकेबाज व ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांचा मनमुराद आनंद घेतला. सर्वार्थाने माझ्या जन्मभूमीतील साहित्यसाम्राटांचा जन्मोत्सव अविस्मरणीय ठरला...!

- डॉ.ओमप्रकाश शेटे