From blogs

माझं गाव,वैराग आदर्श उपक्रम सुंदर संकल्पना

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Aug 01, 2022

माझं गाव,वैराग

आदर्श उपक्रम सुंदर संकल्पना

'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत गावातील विकास व सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील जागरुक नागरिकांनी पुढाकार घेत 'माझं गाव प्रतिष्ठान, वैराग या संस्थेची स्थापना केली आहे. . गावातील जाणकार मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सजग व गावाप्रति आंतरिक तळमळ असलेल्या तरुणांनी या सुंदर संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आज आदर्श उपक्रमाचा श्रीगणेशा केला. यात अबाल वृद्ध व महिलांना योग्य स्थान देत त्यांनाही गावच्या अभिनव चळवळीत सहभागी करून घेतले आहे.

गाव आदर्श होण्यासाठी प्रत्येकाला योगदान देण्याची गरज असल्याची जाणीव असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संतनाथ अन्नछत्र योजना सुरु करुन यापुढेही प्रतिष्ठान लोकोपयोगी व कल्याणकारी उपक्रम राबविणार असल्याची प्रभावी झलक दाखवून दिली आहे. या व्यतिरिक्त शासकीय योजनांवर लक्ष ठेऊन त्यांची योग्य अंमलबजावणी होते का नाही हे पाहण्यासाठी राजकारण विरहित सामाजिक व्यासपीठ उभारण्याचा संकल्प आज सिद्धीस गेला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिष्ठान मध्ये समाविष्ट करून आपलं गाव सुंदर,स्वच्छ व आदर्श करण्यासाठी माझं गाव प्रतिष्ठानच्याद्वारे सुरू झालेली ही चळवळ काही दिवसांत व्यापक झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद मी व्यक्त केला.

प्रतिष्ठानने सुरु केलेल्या श्री सच्चिदानंद संतनाथ अन्नछत्रालयाच्या शुभारंभ प्रसंगी वैरागची भूमिकन्या व जयमल्हार मालिकेतील 'बानू' चे पात्र साकारलेली अभिनेत्री ईशा केसकर आवर्जून उपस्थित होती. माझ्या अध्यक्षतेखाली या भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्राभरात जावो अशी मी श्री संतनाथ चरणी प्रार्थना केली. याप्रसंगी मा. संतोष पाटील ,श्री पुष्कराज गोवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्राध्यापक चंद्रकांत खेंदाड यांनी मानले. हजारो गावकरी उपस्थित होते मात्र महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती.