From blogs

मराठी स्वराज्याच्या भव्यतेची झलक दाखवणारा सरसेनापती हंबीरराव

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Jun 02, 2022

मराठी स्वराज्याच्या भव्यतेची झलक दाखवणारा सरसेनापती हंबीरराव 

दि. २७.०५.२२ रोजी मित्र मयुर कुपाडे यांच्या खास आग्रहास्तव कोथरूड पुणे येथील “ सिटी प्राईड” सिनेमाग्रहात मुख्य अभिनेते प्रविणजी तरडे यांच्यासह सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमीयर शो पहाण्याचे भाग्य लाभले.

गेम ऑफ थ्रोन्स सारखे जगभरात लोकप्रिय शो झक मारतील असे चिक्कार चित्रपट छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर निघू शकतात. इतकी वर्षं हॉलिवूडच्या भिकार प्रेम प्रकरणांच्या चित्रपटांवर पैसा खर्च होत असल्याने आपला जाज्वल्य इतिहास पडद्यावर चितारला जात नव्हता. 

परंतु प्रवीण तरडेंनी आपली प्रतिभा आणि प्रतिष्ठा पणाला लावून २० कोटींच्या बजेटच्या बळावर उभा केलेला "सरसेनापती हंबीरराव" डोळ्यांचे पारणेही फेडतो आणि हृदयात चैतन्यही आणतो.

छत्रपती शिवरायांवर प्रेम न करणारा एकही सच्चा हिंदू मराठी माणूस नाही. त्यामुळे शिवरायांच्या कर्तृत्वावरील चित्रपट म्हटलं की आपण सगळे कसंही करून चित्रपट बघणारच! परंतु या हक्काच्या प्रेमाला न्याय देण्याची जबाबदारी फार कमी दिग्दर्शक आणि निर्माते घेतात! सरसेनापती हंबीररावच्या टीमने मात्र ही जबाबदारी काकणभर अधिकच उचलली आहे!

स्वराज्य निर्मितीचे कित्येक अदृश्य, अस्पष्ट पैलू इतके ठसठशीतपणे आजपर्यंत कधी अड्ड्यावर साकारलेले बघितले नाही. स्वराज्य उभारताना मावळ्यांचे घोडे काय जोरदार दौडले असतील सह्याद्रीत! परंतु आजवर तो रोमांच पडद्यावर कधीच दिसला नाही. ३-४ घोडे, २०-२५ मावळे - असं काहीतरी दिसायचं.

पण या वेळी असं नाही झालं!
पेडगावच्या लढाईचा प्रसंग ज्या ताकदीने उभा केलाय ते बघून आपण मराठी चित्रपटच बघत आहोत ना - असं क्षणभर वाटून गेलं! (खरंतर असं वाटणंच किती लज्जास्पद आहे! असो!)

आणि हे फक्त पेडगाव लढाईत नाही. प्रत्येक फ्रेम-प्रत्येक प्रसंग असाच ग्रँड! असाच लार्जर दॅन लाईफ!

गश्मीर महाजनीने तर अभिनयाची कमाल केली आहे!

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणून एकच चेहरा बघायला कसं वाटेल – हा विचार करत, थोडं धाकधूक करतच गेलो होतो. दोघेही आपले स्वराज्य-सूर्यच! शिवरायांनी स्वराज्याची पहाट घडवून आणली तर शंभू राजांनी स्वराज्य तळपुन काढलं! दुर्दैव असं इतिहासाने आपल्यासमोर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज “वेगळवेगळे”च दाखवले आहेत. संभाजी महाराजांवर इतिहासकारांनी प्रचंड अन्याय केला आहे. हा चित्रपट बघताना मात्र संभाजी महाराज खरे “सिवा का छावा” का आणि कसे होते हे पदोपदी जाणवत, समजत रहातं.

दोन दिवसांवर राज्याभिषेक आलेला असताना, आमचे संभाजी महाराज धर्मासाठी धावून गेले. पंढरपूरच्या वारीवर आलेलं इस्लामी संकट छातीवर घेतलं. वारकरी बनून गनिम छाटुन काढला. त्या आवेशतला गश्मीर आणि आपल्या भाच्याकडे कौतुकाने, प्रेमाने, अभिमानाने बघणारे हंबीरराव – चित्रपट संपल्यानंतर कितीतरी वेळ हेच चेहरे माझ्या डोळ्यासमोर तरळत होते.

एक एक मावळा जोडणारे छत्रपती – “स्वराज्य सांभाळा” म्हणत शेवटचा श्वास घेणारे छत्रपती ज्या गश्मीरने चितारले आहेत, तोच गश्मीर १० मिनिटांनंतर संभाजी महाराज म्हणून समोर येतो आणि थिएटरमधे शिट्ट्याच शिट्ट्या वाजतात. हाच गश्मीर शेवटी हंबीर रावांना आदरांजली देताना अगदीच वेगळाच भासतो! कमाल अर्थातच गश्मीरच्या कसबाची आणि तरडेंच्या दिग्दर्शनाची!

या सगळ्या कल्पक हाताळणी आणि ग्रँड मांडणीत वेळोवेळी जाणवत रहाते ती म्हणजे या चित्रपट निर्मितीत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची कळकळ. एकूण एक प्रसंग अक्षरशः जीव ओतून चितारला गेला आहे. आपला धर्म, आपली संस्कृती पदोपदी दिसत असते.

पेडगाव मोहिमी का महत्वाची होती हे चित्रपट बघितल्याशिवाय कळायचं नाही! मोहिमेचा प्लॅन समोर उभा राहताना आपल्या पारंपरिक गोंधळाचा वापर तर निव्वळ लाजवाब आहे. हंबीररावांची बलोपासना, केवळ दाखवण्यासाठी १-२ प्रसंगात नाही. प्रवीण तरडे जगले आहेत ती! त्या काळात आपल्या मुलीला तलवार फिरवायला शिकवणारे हंबीरराव तरडे हुबेहूब समोर उभे करतात.

एक मराठी चित्रपट २० कोटींचा खुर्दा खर्च करतो हे फार गांभीर्याने दाखल घेण्याजोगं आहे. सरसेनापती हंबीरराव मुळे मराठी भाषेत बिग बजेट घेऊन दर्जेदार चित्रपट निर्मिती होऊ शकते हा आत्मविश्वास निर्मात्यांना, कलाकारांना आणि प्रेक्षकांना सुद्धा येणार आहे. तो आत्मविश्वास आपण टिकवायला, वाढवायला हवा.

आपलं एक तिकीट, एक सोशल मीडिया पोस्ट, एक फॉरवर्ड – या मोहिमेत कामी येणार आहे!

ही सुद्धा आधुनिक अर्थाने स्वराज्य निर्मितीच आहे. 

#जय_भवानी!

#जय_शिवाजी!

डॅा ओमप्रकाश स शेटे