From blogs

शिल्पा, तुझा खुप अभिमान आहे

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date May 28, 2022

डरते नहीं है हम कभी
इन वक्त के तुफानों से ।
जज़्बे से हर वक्त को 
बदलने कि हमें आदत हैं।

शिल्पा, तुझा खुप अभिमान आहे 

कालचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. कारण सुद्धा तसेच आहे. माझी अर्धांगिनी आज सोलापूर समाजरत्न भूषण या राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने सन्मानित होत आहे. आणि हा सन्मान तिला माझ्यामुळे व माझ्या नावाशी जोडली गेली आहे म्हणून नाही तर तिच्या माहेरच्या नावाने मिळाला आहे याचा मला मनस्वी व विशेष आनंद आहे. 

तसं पाहिलं तर 'पुरस्कार' हा विषय माझ्यासाठी नवीन नाही. विद्यार्थीदशेत असताना व समज नसतांना मी अनेक पुरस्काराचा मानकरी झालेलो आहे. आजघडीला मी माझ्या पुरस्काररुपी श्रीमंतीचा जपुन ठेवलेला 'ऐवज' एक मोठी खोली भरेल एवढा 'गडगंज' आहे. मी नवीन घरात पुरस्कार रुपी मिळालेला 'ठेवा' जतन करण्यासाठी खास कक्ष बनवला आहे.

काल पूर्नसंधेला या पुरस्कारांच्या ऐश्वर्यात आणखी एक भर पडली आहे. निवृत्त पोलीस अधिक्षक तथा उद्योजक मा.शिवाजीराव पाटील यांच्या नामांकित अशा जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने माझ्या सौभाग्यवतीला सन्मानित करण्यात आले आहे. फलफले कुटुंब हे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रस्थानी असते. तोच वसा व वारसा घेऊन शिल्पा इतरांच्या सुखासाठी धडपडत असते. शिक्षण, आरोग्य, कृषी आदी क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल पुण्यनगरीत तिचा जो गौरव होत आहे त्याचा सर्वांनाच मनस्वी आनंद आहे.

आज केवळ शिल्पाच्या उल्लेखनीय कार्याचाच 'गौरव' होत आहे असे नाही, तर त्यासोबतच तिची सेवा, समर्पण, त्याग व धाडसाचा 'सन्मान' होत आहे. कुटुंबातील जिवाभावाची सात माणसं काळाने हिरावून नेल्यानंतरही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न डगमगता कणखरपणे उभा राहिल्या. हा 
जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर ठेऊन, अहिल्यामातेचा वसा आणि वारसा घेत शिल्पा आज क्रूर नियतीच्या छाताडवर पाय देऊन उभी आहे. आभाळभर दुःख मागे टाकून ती आई व फलफले कुटुंबाचाच नव्हे तर शेटे परिवाराचा सुद्धा आधार बनली आहे. काळजातील वेदना लपवत चेहऱ्यावर कायम स्मित हास्य ठेवत हजारो नाती तिनं जपली व जोपासली आहेत.

शिल्पाचा सन्मान होत असतांना तिचं तोंडभरून कौतुक करणारे तिर्थरुप आण्णा आज आपल्यात नाहीत. आज ते असते तर त्यांना आभाळ ठेंगणं झालं असतं. बाबा व भैय्या याची छाती अभिमानाने वीतभर फुगली असती. वैरागच्या चिरेबंदी वाड्यात तर अक्षरशः 'दिवाळी' साजरी झाली असती. पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. पण आज शिल्पाच्या आनंदात महाराष्ट्रातील हजारो 'भाऊ' सहभागी झाले आहेत याचे मनोमन समाधान आहे. 

यापुढेही रुग्णसेवेच्या पुण्याईची 'शिदोरी' सोबत घेऊन नव्या उमेदीने जनसेवेचा वसा घेऊन काम करत राहू. या पुरस्काराने आम्हाला शंभर हत्तीचे बळ मिळाले असून आपल्या सर्वांच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेतच..!

टूटते नहीं मुसीबतो में

यही अपनी पहचान हैं।

हिलते नहीं हवाओं से

हम तो एक चट्टान हैं।

पत्थरिली राहों से भी

निकलने की हमें आदत हैं।

जज़्बे से इस वक्त को ही

बदलने कि हमें आदत हैं।

- डॉ.ओमप्रकाश स.शेटे