From blogs

जोड,अद्वितीय व अविस्मरणीय भेट...

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date May 11, 2022

कौटुंबिक स्नेही भगीरथदादा बियाणी यांच्या पुतणीच्या लग्नासाठी वेळ काढून बीड मुक्कामी पोहोचलो. संभाजी सुर्वेचा फोन आला की, "साहेब, मला तुम्हाला भेटायचंय. तुमच्यासाठी मी 'गिफ्ट'आणलंय..!" खरं तर मी त्याला मागील आठ-दहा महिन्यांपासून भेटायचे टाळत होतो. कारण मी कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारत नाही. पण आज त्याने माझा मागोवा काढून मला गाठलेच. मुक्कामी असलेल्या हॉटेलवर संभाजी उशिरा पोहोचला. मला घेऊन हॉटेलच्या वेटिंग हॉल मध्ये घेऊन आला. त्याने माझ्यासाठी आणलेले 'गिफ्ट' पाहून मी अक्षरशः स्तंभित झालो. कारण माझ्या दिवंगत जन्मदात्याची जशाची तशी प्रतिकृती त्याने मला भेट देण्यासाठी आणली होती. आण्णांची हुबेहूब प्रतिमा माझ्यासाठी आयुष्यातील केवळ संस्मरणीय 'गिफ्ट' नसून अजोड, अद्वितीय व अविस्मरणीय 'ठेवा' आहे. यासाठी संभाजीचे करावे तेवढे कौतुक व मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

संभाजी सुर्वे (बीड) याची पहिली भेट ही माझ्या मंत्रालयातील सातव्या माळ्यावरील मंदिरात झाली. हो, मा.देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा माझ्यासाठी मंदिरच होता. एके दिवशी अवघ्या सहा महिन्याच्या ऋची नावाच्या मुलीच्या वडीलांना घेऊन संभाजी तिथे आला होता. त्या चिमुकलीला जन्मतःच “ शौचाची “जागा नव्हती. आणि तिचे ऑपरेशन करण्यासाठी जवळपास एक - दीड लाखाच्या आसपास खर्च डॉक्टरांनी सांगितला होता तो तिच्या पालकांच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर होता. त्या चिमुरडीच्या वेदना व तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू त्यांची आर्थिक परिस्थिती मुक्याने सांगत होते. मी शांतपणे विषय समजून घेतला व फाईल चेक केली. त्या अजारातील गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने त्या लेकरास ऑपरेशन साठी येणारा खर्च दोन दिवसात तातडीनं सुपूर्त केला जाईल असे अधिकृत पत्र संबंधित हॉस्पिटलला दिले. त्या कुटुंबाच्या आनंदाश्रूमधून प्रेरणा घेतलेला संभाजी आता अविरत समाजसेवा करतोय व निरंतर संपर्कात आहे.

तिर्थरुप अण्णांना जाऊन वर्ष होत आहे. त्यांची आठवण पावलोपावली होत असते. मी गेल्यावर्षी कुटुंबासमवेत सहज शेतात गेलो होतो. तिथे मारुती दुनगे यांनी आमचा अण्णांसमवेत सुंदर फोटो काढला. त्यावेळी हे छायाचित्र शेवटचे ठरेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने अण्णांच्या त्याच फोटोची प्रतिकृती संभाजीने बनवून आणली आहे. या पुतळ्यात शेतातील काळी आई, पाठीमागे हिरवागार ऊस, अण्णांचा रुबाबदार कोट, कडक टोपी, बसण्याची लकब सर्व काही जशाच्या तशे..! क्षणभर अण्णांना प्रत्यक्ष पाहतोय असाच भास झाला.माझ्या व शिल्पाच्याही डोळ्यातून नकळत थेंब टपकले.

संभाजी सुर्वे यांनी अण्णांची प्रतिकृती बीडचे शिल्पकार राजेंद्र वाघमारे यांच्याकडून बनवून घेतली आहे. मी ही अनमोल भेट माझ्या हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवली आहे. हा अनमोल ठेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी सुर्वे व वाघमारे यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करेल.

- डॉ.ओमप्रकाश स.शेटे