From blogs

आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती... निरागस आदिवासी व पारंपरिक लोककला...

Blog By डॉ. ओमप्रकाश शेटे / Blog Date Nov 16, 2021

आज माझ्या जीवनातील अभूतपूर्व व अविस्मरणीय अनुभव... निमित्त होते आद्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती महोत्सवाचे. इंग्रज राजवटीत आदिवासी बांधवांच्या मूल वनजमिनी आणि जंगलावर ब्रिटिशांनी गदा आणली. मात्र अन्यायाच्या विरोधात हातात फरशी कुऱ्हाड घेऊन एक आदिवासी तरुण धैर्याने पुढे आला. त्या शूर, पराक्रमी व धाडसी महापुरुषांचे नाव 'बिरसा मुंडा" होय. "उलगुलान" या चळवळीद्वारे सशस्त्र क्रांती करत इंग्रजांना सळो कि पळो करुन सोडणारे भगवान बिरसा मुंडा हे अद्वितीय क्रांतिकारक. त्यांच्या जयंती चे औचित्य साधत स्वातंत्र्यानंतर प्रथमतःच पंतप्रधान श्रद्धेय नरेंद्रजी मोदी यांनी 15 नोव्हेंबर हा "राष्ट्रीय जनजाती गौरव दिन " म्हणून घोषित केला आहे. याच अनुषंगाने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती महोत्सवाचे करंजाळी ता.पेठ जि. नाशिक येथे आदिवासी पाड्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी आदिवासी नृत्य कला, समाजातील गुणवंत , समाजसेवक , राष्ट्रीय खेळाडू , नैसर्गिक पाककृती , आरोग्य कर्मचारी , आदींचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच सी एस आर अंतर्गत 2000 बालकांना उच्च प्रतीचे व्हिटॅमिन युक्त च्यवनप्राश वाटप करण्यात आले.

वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करुन करण्यात येणारे पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण विलोभनीय व रोमांचक होते. यात शेकडो महिला पुरुषांसह तरुण व बालकांनी सुद्धा सहभाग घेतला. अस्सल आदिवासी लोककलेचा भरगच्च सांस्कृतिक समारंभ तब्बल 5 तास चालला. मी खरच स्वतः ला भाग्यवान समजतो की, मला भारताचे खरे मूलनिवासी असलेल्या निरागस आणि भाबड्या आदिवासी बांधवांच्या बरोबर आनंदात घालवता आला.

सदरील भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटक केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांच्या शुभहस्ते झाले तर अध्यक्षस्थानी विधान मंडळाचे उपाध्यक्ष नरहरीजी झिरवळ होते. अप्पर आयुक्त श्री गोलाईत, माझे सहकारी मित्र श्री एन. डी. गावित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आदिवासींना जंगलाचे राजे का म्हणतात ते त्यांच्या वागण्यातील मोठेपणामुळे सहज ज्ञात झाले. यापुढेही जेंव्हा केंव्हा वेळ मिळेल तेव्हा आदिवासी बांधवांसोबत जंगलात जायला मला नक्कीच आवडेल.

|| जय भगवान बिरसा मुंडा ||